(जाकादेवी / वार्ताहर)
लोककलेचे अभ्यासक आणि समीक्षक वैभव बाबल खानोलकर यांनी लिहिलेल्या ‘दशावतार’ या पुस्तकाला ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा राज्यस्तरीय श्रीस्थानक पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कोकणच्या समृद्ध लोककलेचा अभ्यासपूर्ण वेध घेणाऱ्या या साहित्यकृतीला राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याने खानोलकर यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाला मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेचे अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर, कार्याध्यक्ष चांगदेव काळे, कार्यकारी विश्वस्त मकरंद रेगे, संजय चुंबळे, महादेव गायकवाड, दुर्गेश आकेरकर, वृषाली राजे यांच्यासह मालगुंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर उपस्थित होते.
वैभव खानोलकर यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेल्या ‘दशावतार’ या पुस्तकात लोककलेचे स्वरूप, तिची समृद्ध परंपरा आणि तिचे सांस्कृतिक महत्त्व प्रभावीपणे मांडले आहे. पुस्तकातील भाषाशैली आणि प्रसंगकथन वाचकांना सहजपणे जोडून घेणारे आहे. कोकणातील दशावतार ही केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित लोककला नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे, हे या पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक लोककलेचे जुने आणि नवे कलाकार, अभ्यासक तसेच वाचकांसाठी दिशादर्शक ठरणारे आहे.
वैभव खानोलकर हे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात मराठी आणि हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानोली गावचे सुपुत्र आहेत. मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान या पाच विषयांत त्यांनी एम.ए. केले असून ते एम.फिल. पदवीधारक आहेत. सध्या ते दशावतार या लोककलाप्रकारात शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करत आहेत.
‘दशावतार’ हे पुस्तक श्लोक क्रिएशनने प्रकाशित केले असून त्याची एकूण १८९ पाने आहेत. पुस्तकाचे लक्षवेधी मुखपृष्ठ कुडाळ येथील महेंद्र जुवलेकर यांनी तयार केले आहे, तर डॉ. अशोक भांईडकर यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाचा विविध विद्यापीठांमध्ये दशावतार या कला प्रकाराच्या अभ्यासासाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयोग होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
अध्यापन आणि संशोधनाबरोबरच वैभव खानोलकर हे उत्तम निवेदक आणि उत्कृष्ट वक्ते म्हणूनही परिचित आहेत. विविध प्रासंगिक विषयांवर ते सातत्याने वर्तमानपत्रांतून लेखन करतात. तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, अभिनय आणि सेवाभावी क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेऊन त्यांनी आपले उपजत कौशल्य जोपासले आहे.
खानोलकर यांच्या साहित्यकृतीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षकवृंद, मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील ऊर्फ बंधू मयेकर, संस्थेचे पदाधिकारी व संचालक, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबईतील लोककलेच्या जाणकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


