(दापोली)
दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील संतोषीमाता नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा बंद घरामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुवर्णा महादेव रीसबुड (वय ७६) असे मृत महिलेचे नाव असून त्या घरात एकट्याच राहत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा रीसबुड या संतोषीमाता नगर येथील त्यांच्या राहत्या घरी एकट्याच वास्तव्याला होत्या. शांत आणि मितभाषी स्वभावामुळे त्या परिसरातील नागरिकांना परिचित होत्या. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्या घराबाहेर दिसत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. नागरिकांनी त्यांच्या घराजवळ जाऊन अनेकदा हाका मारल्या, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी घराच्या खिडकीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील विजय सपकाळ आणि शेजारी मंदार जुवेकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. घरात प्रवेश करताच बेडरूममध्ये खाटेजवळ सुवर्णा रीसबुड यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता काही दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत मृत्यूबाबत प्राथमिक चौकशी करण्यात आली. मृत महिलेच्या नातेवाईकांच्या खबरीवरून बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार हा नैसर्गिक मृत्यू असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नियमित चौकशी आणि काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

