(संगमेश्वर / वार्ताहर)
ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंचे जतन करण्याच्या उद्देशाने छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि.) यांच्या वतीने संगमेश्वर कसबा येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमातून मंदिर परिसरातील कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, गवत आणि पालापाचोळा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्याचा उद्देश या मोहिमेमागे होता.
रत्नागिरी तालुका आणि जिल्ह्यात गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता मोहिमा तसेच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक शिबिरांच्या माध्यमातून छावा प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे. याच सामाजिक बांधिलकीतून संगमेश्वर कसबा येथील ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिर परिसराच्या स्वच्छतेचे आयोजन करण्यात आले. रविवारी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत स्थानिक नागरिक, युवक, पर्यटक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या भागात साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, गवत आणि पालापाचोळा एकत्र करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या पायऱ्या, घुमट, सभामंडप आणि बाहेरील भागही स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे मंदिर परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर झाला असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
या मोहिमेबाबत मार्गदर्शन करताना छावा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुनील धावडे यांनी संगमेश्वर कसबा येथील ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक प्रसंग संगमेश्वर कसबा, जिल्हा रत्नागिरी येथे घडला. त्यामुळे येथील प्राचीन शिवमंदिर आणि परिसर त्या ऐतिहासिक कालखंडाचे महत्त्वाचे साक्षीदार आहेत, असे त्यांनी सांगितले.
“आपले प्राचीन शिवमंदिर हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. त्याची स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे. आजच्या या मोहिमेमुळे युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत मोठी जागृती निर्माण झाली आहे,” असे सुनील धावडे यांनी नमूद केले.
या उपक्रमाचे पुरातत्त्व विभाग, रत्नागिरी आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने कौतुक करण्यात आले. भविष्यातही अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने सांगण्यात आले. ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि.)चे सचिव समीर गोताड, संघटक तथा जिल्हा मीडिया प्रमुख समीर धावडे, खजिनदार संगम धावडे, महिला संघटक प्रतीक्षा शिगवण, कार्याध्यक्ष नितीन रोडे, श्रीधर आग्रे, सचिन गजबार, सौरभ कर्जवकर आणि विकास माईन उपस्थित होते.


