(दापोली / प्रतिनिधी)
वेळापत्रकात बदल झाल्यामुळे दापोलीतील शिवप्रसाद चौगुले आणि प्रिया चौगुले हे दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. नियोजनानुसार खोऱ्याकडे वेळेवर न जाता, घोडे उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागल्याने त्यांचा जीव वाचला, असा अंगावर काटा आणणारा अनुभव त्यांनी कथन केला.
कोल्हापूर येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत २८ जणांचा समूह काश्मीरमधील पहलगाम येथे गेला होता. १७ एप्रिल रोजी ही सहल सुरू झाली. २२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीकडे जाण्याचे नियोजन होते. परंतु, वेळापत्रकात अनपेक्षित बदल झाल्यामुळे आधी जेवण झाले आणि नंतर शंकर मंदिराला भेट देण्यात आली. या मंदिरात अभिषेक करताना वेळ गेला.
त्यानंतर खोऱ्याकडे जाण्यासाठी घोड्यांची वाट पाहावी लागली, कारण सर्वांसाठी एकाच वेळी घोडे उपलब्ध नव्हते. जेव्हा सर्वांसाठी घोडे मिळाले, तेव्हा ते निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक मोठा गोंधळ उडाला आणि त्यांना घोड्यांवरून खाली उतरवण्यात आले. त्यावेळीच दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली.
“जर घोडे वेळेवर मिळाले असते, तर आम्ही त्या घटनेच्या ठिकाणी आधी पोहोचलो असतो. काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही,” असे सांगताना चौगुले दाम्पत्य भावुक झाले. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नियोजित वेळेनुसार हे दाम्पत्य बुधवारी दुपारी १२ वाजता दापोलीला परतले. “फक्त नशिबाच्या जोरावर आम्ही वाचलो,” असे त्यांनी नमूद केले.