(दापोली)
दापोली तालुक्यातील आसूद रेवाळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने शैक्षणिक इतिहास घडवत एक आगळीवेगळी प्रेरणादायक घटना साजरी केली. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत या शाळेतील सायली संदीप शिर्के हिने घवघवीत यश मिळवले. या यशाच्या जल्लोषात गावकऱ्यांनी तिची पेढे वाटत, घोड्यावरून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
शाळेचे मुख्याध्यापक सौ. संगीता बुरुड, मार्गदर्शक शिक्षक नितीन बांद्रे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांचा सहभाग या सेलिब्रेशनमध्ये उल्लेखनीय ठरला. सायलीला ‘रेंजर’ सायकल भेट देऊन तिचा विशेष गौरव करण्यात आला. हे यश केवळ विद्यार्थिनीचेच नव्हे, तर ग्रामीण भागातील शिक्षणाच्या संधी आणि गुणवत्तेचे प्रतीक ठरले.
वस्तीशाळा म्हणून २००१ मध्ये सुरु झालेल्या या शाळेचे २००९-१० मध्ये नियमित शाळेत रूपांतर झाले. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेतील यश काठावर येऊन हुलकावत होते. मात्र, सन २०२४-२५ या वर्षी सायलीच्या गुणवत्तापूर्वक यशाने शाळेचा नवा अध्याय लिहिला. या प्रसंगी सायलीचे वडील संदीप शिर्के म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण शाळेसाठी सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.”
सायलीचा सन्मान व्हिजन दापोलीच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला दापोलीचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, विस्तार अधिकारी बळीराम राठोड, माजी सभापती अनंत बांद्रे, केंद्रप्रमुख गुलाब गावित, व्हिजन दापोलीचे सचिव सुनील कारखेले, गावचे अध्यक्ष प्रकाश शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष समृद्धी बांद्रे, उपाध्यक्ष शैलेश रांगळे, त्रिवेणी संगम ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे, केंद्रातील शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.