(देवळे / प्रकाश चाळके)
“दिवे लागले रे दिवे लागले… तमाच्या तळाशी दिवे लागले…” कवी शंकर रामाणी यांच्या या ओळींचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना संगमेश्वर तालुक्यातील मोगरवणे गावात घडली आहे. तब्बल २५ वर्षे विजेपासून वंचित असलेल्या दोन कुटुंबांच्या घरात अखेर वीज पोहोचली असून त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे.
देवरुख शहरापासून अवघ्या ७ ते ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगरवणे गावातील चव्हाण आणि आयरे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत होते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटली, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली, मात्र या दोन कुटुंबांच्या घरांपर्यंत वीज पोहोचलेली नव्हती.
ही बाब देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या कुटुंबांच्या घरापर्यंत वीज पोहोचवण्याचा निर्धार केला. महावितरण विभागाशी सातत्याने पाठपुरावा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांनंतर अखेर १६ जून रोजी या दोन्ही घरांमध्ये वीज जोडणी करण्यात आली.
वीज प्रथमच घरात पोहोचल्याचा आनंद चव्हाण आणि आयरे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या घरात दिवे उजळल्याने परिसरातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अभिजित शेट्ये म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेतील ‘अंत्योदय’ ही संकल्पना माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. दोन वर्षांपूर्वी या कुटुंबांची समस्या समोर आली आणि त्यानंतर मी वीज पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. आज या दोन्ही घरांमध्ये वीज पोहोचल्याने खऱ्या अर्थाने समाधान मिळाले आहे.”
मोगरवणे वाडीतील ही घरे मुख्य वस्तीपासून दूर असल्याने वीज जोडणीसाठी मोठा खर्च अपेक्षित होता. त्यामुळे अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला.
आजच्या राजकारणाकडे अनेकदा संशयाच्या नजरेने पाहिले जाते. अशा परिस्थितीत तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात, याचे हे उदाहरण ठरले आहे. मोगरवणेतील दोन कुटुंबांच्या घरात उजळलेला हा दिवा केवळ वीजपुरवठ्याचा नाही, तर आशा, विकास आणि सामाजिक बांधिलकीचाही प्रकाश आहे.

