(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काही दिवसांत लावून रायगड जिल्ह्यातील एका सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून तब्बल ₹2 लाख 18 हजार 999 किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आणखी तीन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिनांक 8 ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान संगमेश्वर एस.टी. स्थानकाजवळील ‘दत्तकृपा मोबाइल शॉपी’ या दुकानाचे शटर उचकटून आणि कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील तीन मोबाईल, एक जीओ राऊटर, एक पॉवर बँक, ब्लूटूथ हेडफोन आणि स्मार्टवॉच असा एकूण ₹51,499 किमतीचा माल चोरून नेला होता. या घटनेप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 117/2025 भा.दं.सं. कलम 305(अ), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी विशेष तपास पथक गठित केले. पथकाने घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचा बारकाईने अभ्यास करून संशयिताचा मागोवा घेतला. तपासात हा गुन्हा शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर पाटील (वय 23, रा. गुंडगे, ता. कर्जत, जि. रायगड) याने केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहापूर व मुरबाड (जि. ठाणे) येथे रवाना झाले. 11 नोव्हेंबर 2025 रोजी शंकर साळुंखेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने संगमेश्वरातील चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला ₹2,18,999 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील चौकशीत साळुंखे याने राजापूर येथे सुमारे महिनाभरापूर्वी स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 190/2025, भा.दं.सं. कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंद आहे. तपासादरम्यान रायगड व ठाणे जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीसारख्या आणखी तीन गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
आरोपी शंकर अर्जुन साळुंखे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाणे करीत आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पो.हे.कॉ. विजय आंबेकर, पो.हे.कॉ. विवेक रसाळ, पो.हे.कॉ. दिपराज पाटील आणि चा.पो.कॉ. अतुल कांबळे यांनी मोलाचा सहभाग नोंदविला.

