(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील पुरातन व चालुक्य राजवटीतील मंदिरातून रविवारी महाशिवरात्री निमित्त शिवशंभोचा गजर घुमला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कळंबस्ते साटलेवाडीतील रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिवलिंगावर विधीवत अभिषेक करण्यात आला. यानंतर आरती संपन्न झाली. साटलेवाडी समाजसेवा आणि मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने परिसरातील सर्व ग्रामस्थांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिर, डेरवण येथील पंत वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. शिबिर आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी साटलेवाडी समाजसेवा मंडळाला धन्यवादही दिले.
कसबा येथे चालुक्य राजवटीतील पुरातन कर्णेश्वर मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात महाशिवरात्र साजरी करण्यात येते. याहीवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये फुलांची आरास करण्यात आली होती. चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिराचा कळस पावसाळ्यात गळत असल्याने पुरातत्व विभागातर्फे पश्चिम बंगाल येथील कारागीर आणून नुकतेच कळसाच्या नूतनीकरणाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहे. कर्णेश्वर देवस्थान समितीच्या वतीने पुरातत्व विभागाला धन्यवाद देण्यात आले आहेत.
फोटो – कसबा येथील कर्णेश्वर आणि कळंबस्ते येथील रामेश्वर पंचायतन मंदिरातील उत्सव मूर्ती शिवलिंग आणि नंदी

