(देवरूख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील सुभद्रा बुधाजी जाधव यांचे रविवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. निधनासमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. पत्रकार निलेश जाधव यांच्या त्या आजी होत.
सुभद्रा जाधव या अत्यंत शांत, प्रेमळ व सुस्वभावी होत्या. त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांनाच आपलेसे केले होते. त्या घरी आलेल्या प्रत्येकाची अगदी अदबीने विचारपूस करीत असत. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते. वाडीतील प्रत्येक कार्यक्रमात तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात त्या हिरहिरीने सहभागी होत असत. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपले कुटुंब सांभाळले. त्यांनी कधी कोणाला दुखावले नाही.
या मे महिन्यात त्यांच्या कुटुंबाने त्यांचा ९० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वृध्दापकाळात कुटुंबाने वाढदिवस साजरा केल्याने त्या अक्षरशः भारावून गेल्या होत्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. यातच त्यांची रविवारी सकाळी राहत्या घरी प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जावून अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, नातवंडे, नातजावई, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

