(संगमेश्वर / एजाज पटेल)
प्रतिस्पर्ध्याचे दोन चार गडी टिपायचेच, या ईर्षेने आतमध्ये घुसून केलेल्या आक्रमक चढाया, टच लाईन ओलांडू पाहणाऱ्याला सोडायचे नाही, या पवित्र्याने केलेल्या अफलातून पकडी अन् डाव्या, उजव्या कोपऱ्यातून वेळीच जोरदार येणारी कव्हर कुमक, काही क्षणांमध्ये घडणाऱ्या या सर्व घडामोडी श्वास रोखून धरायला लावत होत्या.तेर्ये गावातील श्री वाघजाई मंदिर समोरील ऐसपैस असलेल्या मैदानातील लाल मातीही अक्षरशः थरारून जात होती. निमित्त होते तेर्ये गावाने प्रथमच आयोजित केलेल्या कबड्डी लीग स्पर्धेचे. दोन दिवस खेळले गेलेल्या स्पर्धेत सहभागी संघतील खेळाडूंनी चांगलाच दम दाखवला.
दोन रात्र खेळल्या गेलेल्या स्पर्धेत अंतिम विजेता मानकरी संघ ठरला श्री. प्रताप देसाई यांचा प्रतापगड टायटन, तर संघ मालक नाद ग्रुप कोकण 55 संघाने उपविजेत्या पदाला गवसनी घातली. येथे खेळल्या गेलेल्या बुरंबी दशक्रोशी मर्यादित कबड्डी लीग चे पाहिले पर्व होते.वाघजाई ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाश दळवी, गावच्या प्रथम नागरिक दुर्वा भुरवणे, गावचे मानकरी,ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने उदघाट्न सोहळा पार पाडून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.स्पर्धेचे आयोजन उमेश बाईत, सतीश पवार,अजित मोहिते, राजेंद्र बाईत,उदय भुरवणे, श्रीधर जाधव,प्रियल स्ट्रीट्स मुंबईचे सर्व सदस्य,आणि गावातील ग्रामस्थांनी केले होते.
दोन दिवस चाललेले कबड्डी सामने पाहण्यासाठी वाघजाई मंदिर समोरील मैदान हजारो प्रेक्षकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेलेला पहावयास मिळत होता. अंतिम सामन्यात भरारी घेतलेल्या प्रतापगड टायटन आणि नाद ग्रुप कोकण 55 सह्याद्री पलटण या दोन्ही संघांचा येथील लाल मातीच्या मैदानातील कबड्डीतील दम आणि थरार पहायला मिळाला. बलाढ्य अशा दोन्ही संघातील लढतीत सुरुवातीपासून आघाडी आणि पिछाडीवर दोन्ही संघ असताना प्रतापगड संघाने दमदामदार खेळी करत 22 गुण स्वतःच्या पारड्यात पाडून समोरील प्रतिस्पर्धी संघाला 18 गुणांनावरच समाधान मान्यास भाग पाडून श्री वाघजाई क्रीडा मंडळ तेर्ये लीग कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजयी मानकरी होण्याचा मान पटकवला.
खेळ म्हटलं की हार जीत ही असतेच पण जिंकण्यासाठी दिलेली झुंज ही तेवढीच महत्वाची असते.दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडू तशी झुंज देतानाचे चित्र पाहवयास मिळत होती .मात्र नाद ग्रुप कोकण 55 सह्याद्री पलटण संघाला त्यात यश न आल्याने उपविजेत्या पदावरच समाधान मानावे लागले.तर नरेश उर्फ राजू जागुष्टे यांच्या रायगड योद्धा संघाला तृतीय तसेच,मंगेश मांडवकर आणि विश्व्जीत दोरखडे यांच्या पन्हाळा वॉरियर्स संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.
प्रथम विजयी संघास 8001 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, उपविजेता संघास 6001 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 4001 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक 3001 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट चढाई नाद ग्रुप कोकण 55 संघाचा राजेश रायनक याला तर उत्कृष्ट पकड प्रतापगड संघाचा ओंकार फटकरे या दोन खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
विजांच्या लखलखत्या प्रकाश झोतात भव्यदिव्य अशा मैदानातील कबड्डी सामने पाहण्यासाठी तालुक्यातील प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. तर या स्पर्धेचे युट्युबवर थेट प्रेक्षेपण सुद्धा सुरु हो,ते त्याचा लाभही अनेकांनी घेतला.