(मुंबई)
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेवणानंतर झालेल्या संशयित विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात बिर्याणी की कलिंगड यापैकी नेमके कोणते कारण ठरले, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५), आयशा डोकाडिया (१६) आणि झैनब डोकाडिया (१३) या चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी रात्री त्यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे ९ जणांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बिर्याणीचे जेवण केले.
पाहुणे निघून गेल्यानंतर रात्री साधारण १.३० वाजता या कुटुंबातील चार सदस्यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाब सुरू झाले. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी फॅमिली डॉक्टरला बोलावले. प्राथमिक उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सकाळी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
यावेळी त्या बिल्डिंगमधील डॉक्टरांनीही मदत करण्याचा प्रयत्न केला. एका मुलीला CPR देण्यात आला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गंभीर अवस्थेत सर्वांना जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी अब्दुल्ला डोकाडिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याचे सांगितले. त्यामुळे विषबाधेचे नेमके कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही अन्नबाधा बिर्याणीमुळे झाली की कलिंगडामुळे, किंवा दोन्हींच्या एकत्रित सेवनामुळे काही रासायनिक प्रतिक्रिया झाली का, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. उरलेले कलिंगडही अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तपासणीसाठी पाठवले आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण पायधुनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अन्नातून होणाऱ्या विषबाधेबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा सखोल तपास करून सत्य लवकरात लवकर समोर आणण्याची मागणी होत आहे.

