(मुंबई)
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनात्मक कामगिरीची दखल घेत महावितरणला दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी ‘रिन्यूएबल एनर्जी इनिशिएटिव्ह ऑफ द इयर’ तर अपारंपरिक ऊर्जेच्या व्यापक वापरासाठी ‘क्लीन एनर्जी अँड रिन्यूएबल अडॉप्शन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
The Economic Timesतर्फे मुंबईत आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र बिझनेस परिषदेत (दि. २४ एप्रिल) हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, तांत्रिक सहायक अमोल मोरे, माध्यम सल्लागार डॉ. दिनेश थिटे आणि सहायक अभियंता शुभम चोरमाळे यांनी पुरस्कार स्वीकारले.
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅननुसार २०३० पर्यंत सुमारे ३९,५०० मेगावॅट हरित ऊर्जेची भर पडणार आहे. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेचा वाटा १३ टक्क्यांवरून तब्बल ५२ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. महावितरणने आतापर्यंत ४७,३४७ मेगावॅट (सुमारे ६५ टक्के) वीज खरेदीसाठी अपारंपरिक ऊर्जेचे दीर्घकालीन करार (PPA) केले आहेत.
या धोरणामुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि स्वस्त दरात वीज उपलब्ध होऊ लागली आहे. तसेच वीज खरेदीमध्ये सुमारे १० हजार कोटींची वार्षिक बचत होत असून, क्रॉस सबसिडीचा बोजा १३,५०० कोटींनी कमी झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम औद्योगिक व व्यावसायिक वीजदरांवरही दिसू लागला आहे.
दरम्यान, ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ९ लाख १७ हजार सौर पंप कार्यान्वित झाले असून, देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. या योजनेअंतर्गत केवळ ३० दिवसांत ४५,९११ सौर पंप कार्यान्वित करण्याचा विक्रम नोंदवून महावितरणला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचाही सन्मान मिळाला आहे.
या उपक्रमामुळे सुमारे ४२ लाख एकर शेतीला दिवसा आणि मोफत वीजपुरवठा सुरू झाला आहे. शाश्वत ऊर्जा वापर आणि शेतकऱ्यांच्या हिताचा संगम साधणाऱ्या या योजनेमुळे महावितरणच्या कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे.

