(रत्नागिरी)
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अनेक भागातील हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या जेवणाची गैरसोय होत असल्याचा विचार करून गणपतीपुळे स्वयंभू गणपती मंदिरात देण्यात येणाऱ्या मोफत प्रसादाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय देवस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे.
मंदिर परिसरात लावलेल्या सूचनेनुसार, गॅस टंचाईमुळे अन्नपदार्थ तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे भाविकांची जेवणाची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानकडून पुढाकार घेत प्रसाद वितरणाची वेळ वाढवण्यात आली आहे. दररोज दिल्या जाणाऱ्या मोफत प्रसादाचा लाभ अधिकाधिक भाविकांना मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, दुपारी १२.३० ते ३.०० आणि सायंकाळी ७.१५ ते ८.४५ या वेळेत प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंदिर प्रशासनाने केले आहे.
गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार असल्याचे समजते. या निर्णयामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंदिर प्रशासनाच्या या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत केले जात आहे.

