(लांजा)
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील निवसर परिसरात रेल्वेट्रॅकवर गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या अज्ञात तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी निवसर येथील रेल्वे मार्गावर एक अज्ञात तरुण गंभीर जखमी अवस्थेत रेल्वे ट्रॅकमॅनला आढळून आला होता. सदर तरुण रेल्वेतून पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्याने तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत अधिक माहिती असणाऱ्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

