(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकारामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नितीन सातोपे यांच्याकडे गोवा ते पाटणा जाणाऱ्या वास्को–पाटणा सुपरफास्ट एक्सप्रेसचे कन्फर्म तिकीट असतानाही, परप्रांतीय प्रवाशांच्या मुजोरीमुळे त्यांना प्रवास करता आला नाही. या घटनेदरम्यान मदतीसाठी धाव घेण्याऐवजी RPF पोलिसांकडूनच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मनसेने याची गंभीर दखल घेतली. मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (RRM) शैलेश बापट यांची भेट घेत या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला.
शिष्टमंडळाने संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशा घटना घडल्यास मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला. RPF पोलिसांची भूमिका बेजबाबदार असल्याचे सांगत ती सहन केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, शैलेश बापट यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

