( मुंबई )
देशातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा परवाना रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 22(4) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करत हा निर्णय घेण्यात आला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज सार्वजनिक हिताला आणि ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणारे ठरत असल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे. तसेच परवान्याच्या अटींचे पालन करण्यात बँक अपयशी ठरल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.
24 एप्रिल 2026 रोजी जारी आदेशानुसार, कामकाजाचा दिवस संपल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना अधिकृतपणे रद्द करण्यात आला आहे. यानंतर बँकेच्या सर्व बँकिंग सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येणार आहेत. बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी RBI लवकरच उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वीही पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. 11 मार्च 2022 पासून नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2024 मध्ये ठेवी, व्यवहार आणि टॉप-अप यावरही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. नियामक नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याने अखेर RBI ने परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली असली तरी RBI ने ठेवीदारांना दिलासा दिला आहे. बँकेकडे सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याइतकी पुरेशी तरलता (liquidity) उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बँक बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ग्राहकांचे पैसे परत मिळतील आणि ठेवी सुरक्षित राहतील, असे RBI ने सांगितले आहे.
पेटीएम ॲप वापरणाऱ्या काही युजर्सवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांची खाती पेटीएम पेमेंट्स बँकेत आहेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. छोटे दुकानदार आणि विक्रेते, जे पेमेंट स्वीकारण्यासाठी पेटीएम बँकेचा वापर करत होते, त्यांना व्यवहार करण्यात अडथळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी आपले खाते इतर मुख्य बँकेशी लिंक करणे आवश्यक ठरणार आहे. तसेच, पेटीएम पेमेंट्स बँकेशी लिंक असलेले FASTag वापरणाऱ्या वाहनधारकांनाही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा वापरकर्त्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नसून RBI आणि पेटीएम पेमेंट्स बँकेकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खाते सेटलमेंट, पैसे काढणे आणि इतर व्यवहारांबाबतची माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे.

