( मुंबई )
फडणवीस सरकार येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘गोल्डन डेटा’ जाहीर करणार आहे. या उपक्रमामुळे बोगस लाभार्थ्यांचे दिवस संपुष्टात येणार असून, नव्या शासकीय योजनांसाठी स्वतंत्र सर्व्हे करण्याची गरजही राहणार नाही. ‘गोल्डन डेटा’च्या माध्यमातून नागरिकांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
का आवश्यक ठरला गोल्डन डेटा?
‘लाडकी बहीण’ योजनेत अनेक पुरुष तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर, लाभार्थींना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर भविष्यातील योजनांतही फुकट लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना आळा बसावा, यासाठी राज्य सरकारने ‘गोल्डन डेटा’ची निर्मिती केली आहे.
गोल्डन डेटामध्ये काय असेल?
राज्यातील प्रत्येक नागरिकाची आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक इत्थंभूत माहिती या डेटाबेसमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. यामुळे नव्या योजनांसाठी सर्व्हे करण्याऐवजी थेट ‘गोल्डन डेटा’चा वापर करता येईल.
१४–१५ कोटी नागरिकांची माहिती एका क्लिकवर
या डेटाबेसमध्ये राज्यातील १४ ते १५ कोटी नागरिकांची नोंदणी करण्यात आली असून, सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ‘गोल्डन डेटा’च्या आधारेच ‘लाडकी बहीण’ योजनेतील तब्बल २६ लाख बोगस लाभार्थ्यांची ओळख पटली आहे. त्यामुळे भविष्यात योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व कार्यक्षम होणार आहे.

