(मुंबई)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडला होता. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी एकमताने त्यास अनुमोदन दिले. शरद पवारांनी औपचारिक घोषणा करत शिंदे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली.
जयंत पाटील यांचा सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; नवे नेतृत्व तयार
जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात त्यांनी खुलेपणाने नव्या नेतृत्वासाठी मार्ग मोकळा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षात नव्या चेहऱ्यास संधी देण्यात आल्याचे दिसून आले.
शशिकांत शिंदे यांचा राजकीय प्रवास
शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून, माथाडी कामगारांच्या प्रभावी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला.
शिंदे यांनी १९९९ साली प्रथमच जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यांनी राज्य सरकारच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
२००९ ते २०१४ या कालावधीत ते कोरेगाव मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी त्या निवडणुकीत शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. याशिवाय ते दोन वेळा जावळी मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.
मागील निवडणुकीत अपयश, विधान परिषदेत सक्रिय भूमिका
२०१९ आणि २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. २०२४ साली त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. सध्या शशिकांत शिंदे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
पक्ष संघटनासाठी नवे नेतृत्व सज्ज
शशिकांत शिंदे यांच्या नावाची निवड ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि अनुभवी नेतृत्वाचा पक्षाला आगामी काळात नक्कीच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

