(मुंबई / वृत्तसंस्था)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत पक्षातील प्रमुख नेत्यांनी सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत पक्षाचे नेतृत्व, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची कार्यपद्धती तसेच राज्यातील पक्षाची घसरती स्थिती याबाबत नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्षातील मतभेदांचा परिणाम महायुती सरकारच्या कामकाजावर होत असल्याचे शहा यांनी निदर्शनास आणून देत सर्व नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. या घडामोडींमुळे पक्षात पवार आई-लेक विरुद्ध अन्य नेते अशी विभागणी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ यांनी सोमवारी सकाळी अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीसाठी प्रफुल्ल पटेल यांनी वेळ मागितली होती आणि त्यानुसार त्यांना वेळ देण्यात आली. मात्र, पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार या बैठकीला उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात त्याची विशेष चर्चा झाली. या भेटीची माहिती पक्षनेतृत्वाला होती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिले.
बैठकीत पक्षांतर्गत मतभेद, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कामकाजाची पद्धत तसेच राज्यात राष्ट्रवादीची होत असलेली पिछेहाट या मुद्द्यांवर नेत्यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. पक्षातील वादाचा महायुती सरकारवर परिणाम होत असल्याचे शहा यांनी नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पक्षातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन कामकाज सुरळीत ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिल्याची माहिती आहे.
यापूर्वी गेल्या महिन्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या वेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित नव्हते. या भेटीनंतर पक्षाचे नेतृत्व आणि पहिल्या फळीतील नेते यांच्यातील संबंधांबाबत चर्चा सुरू झाली होती. पक्षात पार्थ पवार यांचा प्रभाव वाढत असल्याने ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या एका पत्रावरूनही राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद सध्या रिक्त असून, या पदासाठी दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ इच्छुक आहेत. सोमवारी अमित शहा यांची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये या तिघांचाही समावेश होता. समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी छगन भुजबळ आग्रही असल्याचे सांगितले जाते. भाजपकडे असलेले अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे, मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा आणि भाजपसोबतचे संबंध सुधारावेत, यासाठी पक्षाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थ खाते आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
दुसरीकडे, सोमवारी रात्री देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पक्षातील नव्या निवडी आणि संघटनेसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे सांगतानाच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सोमवारी झालेल्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा होण्याचा प्रश्नच नव्हता, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षातील परिस्थिती, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली चर्चा आणि कोअर कमिटीच्या बैठकीतील निर्णयांबाबत भूमिका स्पष्ट केली. पक्षात नाराजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत त्यांनी नाराजीनाट्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक उद्या (मंगळवारी) बोलावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीतील चर्चेबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “आज आम्ही या बैठकीत प्रदीर्घ चर्चा केली. त्यामध्ये दुष्काळ व त्या संदर्भातील समस्या आणि पक्षाच्या उद्याच्या (मंगळवारी) दिवसातील काही कार्यवाही, यासाठी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावलेली आहे. त्या अनुषंगाने पक्ष संघटना व विधिमंडळाचे आमचे सदस्य अशा सर्व विषयांवर आम्ही चर्चा केली. पक्षाच्या कामकाजाबाबतही आम्ही चर्चा केली. एकसंघपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम कसं करता येईल, या पार्श्वभूमीवर आम्ही चर्चा केली.”
पक्षातील नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी, “आमच्यात नाराजीनाट्य असण्याचं कोणतंही कारण नाही,” असे स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने एकजुटीने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


