(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. पायल अक्षय झांबरे (वय २९) हिच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. कौटुंबिक कारणांसह हुंडा आणि मानपानावरून पायलला त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती अक्षय, सासू मंगल झांबरे, अरविंद झांबरे आणि अक्षता झांबरे निंबाळकर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायल ही मुकुंदनगर, सहकारनगर परिसरात राहत होती. काही वर्षांपूर्वी तिचा अक्षय झांबरे याच्याशी विवाह झाला होता. विवाहाला सहा वर्षे झाल्याची माहिती असून, या दाम्पत्याला एक मुलगी आहे. पायलने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. ती खेडशिवापूर येथील व्यावसायिक आणि नक्षत्र पॅलेसचे मालक पवार यांची मुलगी होती.
सोमवारी सकाळी मुकुंदनगर येथील जुन्या फ्लॅटमध्ये पायलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येच्या आदल्या रात्री पायलचा सासूसोबत जोरदार वाद झाला होता. या वादानंतर पती आणि सासूने तिला मारहाण केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. मारहाणीमुळे घाबरलेल्या अवस्थेत पायल माहेरी आली होती. सासरी घडलेल्या प्रकाराची माहिती तिने आपल्या कुटुंबीयांना दिली होती, असेही तिच्या भावाने सांगितले.
पायलच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर हुंडा आणि मानपानावरून तिचा छळ सुरू होता. विवाहाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हुंडा आणि मानपान देण्यात आले होते, तरीही गेल्या काही महिन्यांपासून तिला सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी पायल घरात दिसत नसल्याचा फोन तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान तिचे नातेवाईक झांबरे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी सासरची मंडळी घरात उपस्थित होती. मात्र, माहेरचे नातेवाईक आल्यानंतर ‘गाडी घेऊन आम्ही निघालो आहे, आम्ही तिला स्वारगेटला शोधतो,’ असे सांगून ते तेथून निघून गेल्याचा दावा पायलच्या भावाने केला आहे.
दरम्यान, पायलच्या आत्महत्येची बातमी समजताच माहेरच्या नातेवाईकांनी मुकुंदनगर येथे धाव घेतली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि परिचितांनी झांबरे यांच्या घराची तसेच झांबरे पॅलेस या मंगलकार्यालयाची तोडफोड केली. मंगलकार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी पायलच्या भावाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे, अरविंद झांबरे आणि अक्षता झांबरे निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला अटक केली असून, कौटुंबिक छळ आणि मारहाणीच्या आरोपांसह संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.


