( पुणे/सोलापूर )
राज्यात भोंदू बाबांच्या प्रकरणांची मालिका सुरू असताना आणखी एक धक्कादायक कारवाई समोर आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरात छापा टाकून स्वतःला “बाळू मामाचा अवतार” म्हणवणाऱ्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू मनोहर भोसले उर्फ “मनोहर मामा” याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या आधारे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापेमारी करत त्याला अटक केली. सध्या त्याला सोलापूरला आणण्यात आले असून न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
अनेक गुन्ह्यांचा इतिहास
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मनोहर भोसले याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. करमाळा, सोलापूर तालुका, बारामती आणि दौंड येथे महिलांवरील अत्याचार तसेच आर्थिक फसवणुकीचे प्रकरण नोंदवण्यात आले होते. काही प्रकरणांमध्ये तो सध्या जामिनावरही होता.
भक्तांची फसवणूक कशी करत होता?
व्यवसायात भरभराट, आजारातून मुक्ती किंवा कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी पूजा-अर्चा करण्याचे आमिष दाखवून तो लोकांकडून मोठ्या रकमा उकळत असल्याचा आरोप आहे. एका प्रकरणात त्याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 50 हजार रुपये घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीची फसवणूक झाल्याचे समोर आले. यानंतर पीडिताने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गंभीर आरोप: महिलांचे शोषण
मनोहर मामा याच्यावर महिलांना आध्यात्मिक उपायांच्या नावाखाली फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचेही आरोप आहेत. तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्याचे खोटे दावे करून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याचेही तपासात पुढे आले आहे. लोकांचे भविष्य सांगताना संत बाळूमांच्या नावाने मनोहरमामाने करोडो रुपयांची स्थावर मालमत्ता जमविली आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे काही राजकीय नेते आणि अधिकारी त्याच्या संपर्कात असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. महत्त्वाच्या पदांसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी त्याचा सल्ला घेतला जात असल्याचीही माहिती समोर येत आहे.
राज्यात गाजत असलेल्या मनोहर भोसले याने लोकांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो लोकांचा खासगी डेटा गोळा केला आहे. एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवित, तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो, असा दावा क्रांतिकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे. दरम्यान, अनेक मातब्बर राजकीय बड्या हस्तींचे मनोहर मामासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आणखीनच भर पडली आहे. पोलिस तपासात याबाबत अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.
मनोहर भोसले उर्फ “मनोहर मामा” हा 2013 पर्यंत झोपडीत राहत होता. मात्र त्यानंतर अल्पावधीतच त्याच्या संपत्तीत झालेली झपाट्याने वाढ आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्याच्या नावावर कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे सुमारे 9 एकर जमीन आहे, तर पत्नीच्या नावावर तब्बल 27 एकर जमीन नोंदवली गेली आहे. करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे दीड एकर जमीन, सुमारे 1000 चौरस फूटाचा बंगला, मठ, तसेच बारामती तालुक्यातील सावंतवाडी-गोजुबावी परिसरात आणखी एक मठ उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय, महागडे फर्निचर, उच्च किमतीचे मोबाईल, वीज-पाणी सुविधा, संरक्षक भिंती यांसारख्या खर्चिक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे. ही सर्व मालमत्ता आणि खर्चाचा स्रोत नेमका काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मनोहर भोसले याने काही मराठी टीव्ही मालिकांना आर्थिक सहाय्य केल्याचीही माहिती पुढे आली आहे. या मालिकांचे निर्माता संतोष गजानन आयचित हा भोसलेचा व्यावसायिक भागीदार असल्याचे सांगितले जात आहे. बारामती येथील प्रकरणात जप्त करण्यात आलेली गाडीही संतोष आयचित यांच्या नावावर असल्याचे तपासात उघड झाले आहे.
अलीकडच्या काळात राज्यात अशा प्रकरणांची संख्या वाढली आहे. नाशिकमधील अशोक खरात आणि संगमनेरमधील राजेंद्र गडगे यांच्याविरोधातील कारवाईनंतर आता मनोहर मामा प्रकरणाने पुन्हा एकदा भोंदूगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 2021 मध्ये मनोहर मामा भोसले याच्यावर 4 गुन्हे दाखल झालेले होते. सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणला हे गुन्हे दाखल झाले होते. बलात्कार, विनयभंग आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यांअंतर्गत कारवाई सुरू असून तपास अधिक खोलवर केला जात आहे. या प्रकरणात आणखी पीडित पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

