( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील चर्मालय स्मशानभूमी शेजारील चौकात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट कंपनीच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कामकाजामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, महामार्ग प्राधिकरण विभागाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठेकेदार कंपनीकडून चर्मालय चौकातील रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र दिवसभर दिसून येते. कोणतेही पर्यायी मार्ग किंवा वाहतूक नियोजन न करता काम हाती घेतल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. खोदाई करून अर्धवट अवस्थेत ठेवलेल्या रस्त्यामुळे वाहनांची रांग किलोमीटरपर्यंत वाढताना दिसत आहे. या गोंधळात पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना अक्षरशः हैराण झालेले पाहायला मिळत असतात. दरम्यान, महामार्ग प्राधिकरण विभागाचे संबंधित अधिकारी ठेकेदार कंपनीवर कोणताही अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात का, की फक्त कागदोपत्रीच कामकाज चालते? ठेकेदाराच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असतानाही ती पार पाडण्यात का कुचराई होते? या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. कामाची गती, नियोजन आणि सुरक्षिततेचे निकष यांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र असून, ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप वाहनचालकांसह नागरिकांकडून होत आहे.

चर्मालय परिसरात वाहनाची कायम वर्दळ असते. महामार्गाचे काम सुरू करण्याआधी वाहतुकीचे नियोजन करणे ही प्राथमिक जबाबदारी असताना, ती पूर्णपणे डावलण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली कामे सुरू केली जात असली, तरी त्याची अंमलबजावणी करताना नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे या प्रकारातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन या बेजबाबदार कारभारावर लगाम घालणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.


