(रायगड / पनवेल)
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल (HPCL) पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील सुमारे 3 हजार एलपीजी गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यासोबत पाताळगंगा नदीत वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या सिलेंडरपैकी काही भरलेले तर काही रिकामे असल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट इशारा देत, नदीत किंवा नदीकाठावर आढळणाऱ्या कोणत्याही सिलेंडरला हात लावू नये, हलवू नये किंवा घरी नेण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगितले आहे.
चावणे येथील अतिरिक्त एमआयडीसीमधील एचपीसीएलच्या प्लॉट क्रमांक ई-1/7 मधून हे सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे पाताळगंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये हे सिलेंडर वाहून येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना सावध करत सांगितले की, वाहून आलेल्या सिलेंडरमध्ये गॅस आहे की नाही किंवा ते सुरक्षित स्थितीत आहेत का, याची खात्री नसते. त्यामुळे उत्सुकतेपोटी किंवा वापराच्या उद्देशाने असे सिलेंडर उचलणे, उघडणे किंवा हलविणे जीवघेणे ठरू शकते.
सिलेंडर आढळल्यास काय करावे?
प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:
- नदीत किंवा नदीकाठावर गॅस सिलेंडर आढळल्यास त्याला स्पर्श करू नये.
- तत्काळ जवळच्या पोलीस ठाणे, महसूल विभाग किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला माहिती द्यावी.
- सिलेंडर स्वतःजवळ ठेवू नये किंवा घरी नेऊ नये.
- शक्य असल्यास तो एचपीसीएल कंपनी, अधिकृत एचपीसीएल वितरक, तहसीलदार कार्यालय (खालापूर/पेण) किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण येथे जमा करावा.
अफवांवर विश्वास ठेवू नका
जिल्हा प्रशासनाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास स्वतः कृती करण्याऐवजी संबंधित यंत्रणांना माहिती देणे अधिक सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुरक्षिततेला प्राधान्य द्या
मुसळधार पावसामुळे नदीपात्रातून विविध वस्तू वाहून येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. संशयास्पद वस्तूंना हात लावू नये आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रायगडमधील पूरस्थितीची तीव्रता त्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या सिलेंडरचा शोध घेऊन ते सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

