(वॉशिंग्टन / वृत्तसंस्था)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांविरोधात कडक भूमिका घेत द्विपक्षीय निर्बंध विधेयकाचा मार्ग मोकळा केला आहे. या विधेयकात भारतासह रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर तब्बल 500 टक्के आयात टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव असून, ट्रम्प यांनी याबाबत थेट इशाराच दिला आहे.
रशियाकडून कच्च्या तेलाची थेट खरेदी करणाऱ्या देशांमुळे रशियाला आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर भारत, चीन आणि ब्राझील हे देश अमेरिकेच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत हे द्विपक्षीय निर्बंध विधेयक मंजूर झाले असून, या कायद्याचा वापर करून संबंधित देशांवर दबाव आणला जाण्याची शक्यता आहे.
या नव्या विधेयकानुसार रशियाकडून तेल किंवा अन्य वस्तू खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के प्रचंड टॅरिफ लावण्यात येऊ शकतो. याचा थेट परिणाम भारतीय व्यापार आणि निर्यातीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे 8 जानेवारी रोजी भारतातील वस्त्रोद्योग आणि कोळंबी निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली.
अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी सांगितले की, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियाला आर्थिक मदत करणाऱ्या देशांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्याच्या सुरुवातीला या विधेयकावर मतदान होणार असून, ट्रम्प यांनी या निर्बंध विधेयकाला पाठिंबा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या कायद्यावर काम सुरू असल्याचेही ग्राहम यांनी स्पष्ट केले.
या विधेयकाचे नाव “रशियावर प्रतिबंध अधिनियम 2025” असे असून, रशियाला मदत करणाऱ्या देश, संस्था आणि व्यक्तींवर व्यापक दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद त्यात आहे. रशियातून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 500 टक्के कर आकारण्याचाही प्रस्ताव या विधेयकात समाविष्ट आहे.
दरम्यान, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी मोदींसोबतचे संबंध अद्याप चांगले असल्याचे सांगितले. तरीही अमेरिकेच्या धोरणाशी विसंगत भूमिका घेतल्यास भारतावर टॅरिफ वाढवण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही ट्रम्प यांनी दिला.
शेअर बाजारावर परिणाम
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर वस्त्रे आणि कोळंबी निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसला. कोळंबी निर्यात करणाऱ्या एपेक्स फ्रोजन फूड्सच्या शेअर्समध्ये सुमारे 6 टक्के, तर अवंती फीड्सच्या शेअर्समध्ये सुमारे 7 टक्के घसरण झाली. संभाव्य टॅरिफ वाढीमुळे पुढील काळात भारतीय निर्यातदारांवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

