( मुंबई )
धुळे, नाशिक आणि बीड जिल्ह्यांतील तीन प्रभागांमध्ये उमेदवारांचे निधन झाल्याने सदस्यपदाच्या निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली आहे. मात्र या प्रभागांमध्ये अध्यक्षपदासाठीचे मतदान नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर प्रभाग क्र. २ मधील कुसूमबाई पाथरे, नाशिक जिल्ह्यातील मनमाड प्रभाग क्र. १० मधील नितीन अनिल वाघमारे आणि बीड जिल्ह्यातील गेवराई प्रभाग क्र. ११ मधील दूरदानाबेगम सलीम फारूकी या उमेदवारांचे, वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निधन झाले. यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते.
आयोगाने कायदेशीर तरतुदींचा आढावा घेत निर्णय दिला की, संबंधित प्रभागांमध्ये दोन सदस्यीय जागा असल्याने, सदस्यपदाची निवडणूक प्रक्रिया थांबविणे आवश्यक आहे. मात्र त्या-त्या प्रभागातील अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया यथावत सुरू राहील. या तीन प्रभागांतील सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी नवीन निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

