(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याच्या दिशेने आयडीबीआय बँक, रत्नागिरी शाखेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून पुढाकार घेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचे वितरण केले. जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने पार पडलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत एकूण ११२ एक्झामिनेशन टेबल, १०० अल्ट्रासोनिक नेब्युलायझर आणि १०५ फिटल डॉपलर यांसारख्या अत्यावश्यक उपकरणांचा समावेश असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण करण्यास ही साधने उपयुक्त ठरणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दैनंदिन कामकाजात या उपकरणांमुळे गती येणार असून, रुग्णनिदान आणि उपचार प्रक्रियेला बळकटी मिळणार आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम समिती सभापती विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वेदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव व सागर पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध समित्यांचे सभापती व सदस्य उपस्थित होते.
आयडीबीआय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आशुतोष कुमार यांनी सीएसआर उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक प्रकल्पांची माहिती देताना, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात बँकेची सक्रिय भूमिका अधोरेखित केली. त्यांच्या हस्ते तसेच क्षेत्रीय महाव्यवस्थापक सुब्रमण्यम एन. उपमहाव्यवस्थापक (पुणे झोन) तुषार बोडस आणि शाखाधिकारी अमोल पुजारी यांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधा अधिक सक्षम होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. आयडीबीआय बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत भविष्यातही अशा सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

