(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांचे हाल अक्षरशः वाढले आहेत. अपूर्ण कामे, असुरक्षित पर्यायी रस्ते आणि दुर्लक्षित सुरक्षायंत्रणा यामुळे प्रवास करताना दररोज जीव मुठीत धरावा लागत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
महामार्गाच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेले मातीचे डायव्हर्जन रस्ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. घसरडी पृष्ठभाग, खड्डे आणि असमतोल रचना यामुळे वाहनचालकांचा ताबा सुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी सर्विस रोडच तयार नसल्याने वाहतुकीचा ताण मुख्य मार्गावर येत आहे, तर ज्या ठिकाणी हे रस्ते अस्तित्वात आहेत तेही पूर्णपणे मातीचे असल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय महामार्गावर ठिकठिकाणी टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि सुरक्षेच्या प्राथमिक उपाययोजनांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
चौपदरीकरणाच्या कामात अपेक्षित असलेली संरक्षण भिंत उभारण्याचे कामही अद्याप सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संगमेश्वर ते माभळे दरम्यान करण्यात आलेल्या खोल खोदकामामुळे स्थानिकांच्या दैनंदिन ये-जा मार्गांवर गंभीर परिणाम झाला आहे. भर उन्हाळ्यात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, धूळ नियंत्रणासाठी पुरेशा प्रमाणात पाणीही टाकले जात नसल्याची तक्रार पुढे येत आहे.
दरम्यान, येऊ घातलेल्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

