(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गुहागर येथील बहुचर्चित ‘गोल्डनमॅन’ तसेच कासव संवर्धनासाठी परिचित असलेले विश्वास महादेव खरे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तब्बल १२ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोपखेल, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, पुणे) या दोघांना खून आणि चोरीच्या आरोपात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावली.
१ ऑक्टोबर २०१४ रोजी गुहागर येथील ‘खरे प्लेझर पॉईंट’ या होमस्टेमध्ये विश्वास खरे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तपासानुसार, गळ्यातील सुमारे १० तोळ्यांची सोन्याची साखळी लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघा पर्यटकांनी विळा आणि सुर्याने तब्बल २१ वार करत त्यांची हत्या केली होती. त्यानंतर सोन्याची साखळी घेऊन आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर सुमारे तीन महिन्यांनी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुहागर पोलिसांनी संयुक्त तपासातून आरोपींचा माग काढत जानेवारी २०१५ मध्ये अमोल गाढवे, किरण कुचेकर तसेच त्यांना माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली विष्णू किसन तनपुरे (रा. दिघी, पुणे) यांना अटक केली होती. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी सुरुवातीला खेड सत्र न्यायालयात, त्यानंतर चिपळूण सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीजन्य पुराव्यांची सुसंगत मांडणी करत तब्बल ५१ साक्षीदार तपासले. मयताचे नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी, हस्ताक्षर तज्ज्ञ, मोबाईल कंपन्यांचे नोडल अधिकारी तसेच इतर महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी या खटल्यात निर्णायक ठरल्या. खटल्यादरम्यान काही प्रमुख पंच आणि सोनार साक्षीदार फितूर झाले होते. मात्र, सरकार पक्षाने प्रभावी उलटतपासणी करून आरोपी घटनेच्या दिवशी गुहागरमध्ये उपस्थित असल्याचे मोबाईल टॉवर आणि कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे सिद्ध केले. तसेच आरोपीने चोरीतील सोन्याची साखळी विकल्याचेही पुराव्यांतून स्पष्ट झाले. या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपी अमोल गाढवे आणि किरण कुचेकर यांना दोषी ठरविले.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विनीत चौधरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केला होता. विशेष म्हणजे, चिपळूण येथे नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सलग ऐकत जवळपास १२ वर्षे प्रलंबित असलेल्या या खटल्याचा अवघ्या १२ दिवसांत निकाल दिला. या निर्णयामुळे विश्वास खरे यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा झाल्याने समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल, असा विश्वास सरकार पक्षाने व्यक्त केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले, तर पैरवी अंमलदार म्हणून पोलिस हवालदार प्रदीप भंडारी आणि आशिष शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

