( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्ह्यातील बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा सोहळा यंदा ३० ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ, रत्नागिरी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सन २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. दहावीमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी, बारावीमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी, नर्सिंग, वकिली यांसह विविध शाखांतील पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीरही घेण्यात येणार आहे. मुळात हा कार्यक्रम रविवारी, २४ ऑगस्ट रोजी होणार होता. मात्र हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तो पुढे ढकलण्यात आला.
सदर सोहळा शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (जुने वसतिगृह), नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी बौद्ध समाजातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी तसेच पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

