( चिपळूण )
चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या आधुनिक कलादालनाला ‘निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन’ असे नाव देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. निलेश बापट यांच्या स्मरणार्थ हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या नामकरणासाठी विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी शासन व वन विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महसूल व वन विभागाने अखेर या प्रस्तावास हिरवा कंदील दिला.
रत्नागिरी जिल्हा वन विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चिपळूण येथील वन विभाग संकुलात हे आकर्षक आणि अभ्यासपूर्ण कलादालन उभारण्यात आले आहे. या कलादालनाची संकल्पना, आराखडा आणि मांडणी तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक स्वर्गीय निलेश विलास बापट यांनी केली होती.
स्व. निलेश बापट यांनी निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनासाठी आयुष्य समर्पित केले होते. ‘सह्याद्री निसर्गमित्र’, ‘ग्लोबल चिपळूण’ आणि ‘आरोही’ या संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, विविध अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण देणे, जनजागृती उपक्रम राबवणे आणि वन्यजीव बचाव मोहिमांमध्येही ते सक्रिय होते.
या नामकरणासाठी अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, रंजिता फाउंडेशन, नवकोकण एज्युकेशन सोसायटी, सह्याद्री निसर्गमित्र, नगरसेवक निहार कोवळे आणि परिवर्तन संस्था यांनी पुढाकार घेतला होता.
या संदर्भात आमदार शेखर निकम यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर वन विभागाने प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि अखेर त्यास मंजुरी मिळाली. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांचीही या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
या निर्णयाबद्दल चिपळूणवासीयांनी समाधान व्यक्त केले असून विविध सामाजिक संस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.

