(चिपळूण /प्रतिनिधी)
शहरातील मार्कडी परिसरातील वन विभागाच्या संरक्षक भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या कमळ चिन्हावरून निर्माण झालेल्या वादाची अखेर वन विभागाने दखल घेत संबंधित चिन्ह हटवून भिंत पूर्ववत रंगवली आहे. शासकीय मालमत्तेवर राजकीय पक्षाचे चिन्ह उमटवल्याच्या प्रकारावरून निर्माण झालेल्या राजकीय प्रतिक्रिया आणि निवेदनांनंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले.
वन विभागाच्या विभागीय कार्यालयालगत नव्याने उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले कमळ रंगविण्यात आले होते. हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी शासकीय मालमत्तेचा पक्षीय प्रतिकांसाठी वापर करणे नियमबाह्य असल्याचे नमूद करत संबंधित चिन्ह तातडीने हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोटे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने तत्काळ हालचाल करत कमळ चिन्हावर रंग देऊन संपूर्ण भिंत एकसमान रंगवली. त्यामुळे वादग्रस्त चिन्ह पूर्णपणे हटविण्यात आले असून भिंत मूळ स्वरूपात आणण्यात आली आहे.
दरम्यान, शासकीय मालमत्तेच्या वापराबाबत प्रशासनाने अधिक दक्षता बाळगावी, अशी अपेक्षा स्थानिक स्तरावर व्यक्त होत असून या घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक मालमत्तेच्या राजकीय वापराचा प्रश्न चर्चेत आला आहे.

