( नवी दिल्ली )
देशाच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे. आम आदमी पार्टी (AAP) मध्ये मोठी फूट पडत राघव चढ्ढा यांच्यासह 7 राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) जाण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच पक्षाने राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले होते. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आम आदमी पार्टीपासून दूर जात जनतेच्या बाजूने उभे राहणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राघव चढ्ढा यांच्यासोबत राजिंदर गुप्ता, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, विक्रमजीत सिंग सहानी, हरभजन सिंग आणि स्वाती मालीवाल यांनीही भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभेत एकूण 10 खासदार होते. त्यापैकी 7 खासदारांनी पक्ष सोडल्याने AAP ची ताकद मोठ्या प्रमाणात घटली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राघव चढ्ढा यांनी संविधानातील तरतुदींचा संदर्भ देत म्हटले, “दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्य एखाद्या पक्षातून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेत असतील, तर ते कायदेशीर आहे. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेत आहोत.”
या घडामोडींनंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “बीजेपी ने फिर से पंजाबियों के साथ किया धक्का,” असे म्हटले आहे.
सध्या आम आदमी पार्टीत संत बलबीर सिंग, संजय सिंह आणि नरेन गुप्ता हे तीन खासदार उरले आहेत. राज्यसभेतील AAP च्या खासदारांमध्ये पंजाबमधील प्रतिनिधींची संख्या जास्त असल्याने या फुटीचा सर्वाधिक फटका पंजाबमधील पक्ष संघटनेला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचे मोठे राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे.

