(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील नामांकित केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) यांचे बुधवारी रात्री साखरपा–देवरुख मार्गावर अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून दागिने व रोख रकमेची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय केतकर हे साखरप्यातील एका घरगुती कार्यक्रमाहून रात्री सुमारास दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान गाडीने देवरुखकडे परतत होते. वांझोळेपासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या गाडीला दुसऱ्या वाहनाने धडक दिली. नुकसानभरपाईच्या बहाण्याने वाद घालणाऱ्या अज्ञातांनी केतकर गाडीतून उतरल्याबरोबर त्यांच्या अंगावर बुरखा टाकला व जबरदस्तीने आपल्या गाडीत ओढून नेले. यानंतर हल्लेखोरांनी त्यांना वाटुळ परिसरात नेऊन मोठ्या रकमेची मागणी केली. त्यांच्या जवळील सुमारे पंधरा लाखांचे दागिने व रोख वीस हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर केतकर यांना मारहाण करून तेथून सोडून दिल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरवून अज्ञातांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस यंत्रणा कसून तपास करत असून परिसरात नाकेबंदीही करण्यात आली आहे. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेट्ये यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मार्लेश्वर फाट्याजवळ विशेष फील्डिंग लावली. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३११, ३०९ (४), ३१० (१), १४० (२), १२७ (२), ११५ (२), ३५१ (२) अन्वये रजि.नं. १०४/२०२५ असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

