(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील तूरळ येथे आज (रविवार) सकाळी खळबळजनक घटना घडली. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या एका बिबट्याला स्थानिकांनी प्रसंगावधान राखत कोंबड्यांच्या खुराड्यात अडकवले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.
ही घटना तूरळ गावातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या मधुकर कुंभार यांच्या घराजवळ घडली. सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात कोंबड्यांचा ओरडण्याचा आणि फडफडण्याचा मोठा आवाज येऊ लागला. आवाज ऐकून अवधूत कुंभार हे धावत खुराड्याकडे गेले. आतून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येत होता. त्यांनी प्रसंगावधान राखून दरवाजा झटकन बंद केला आणि बिबट्याला खुराड्यातच अडकवले.
या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संदेश जाधव, सोमनाथ खाडे, गिरप्पा लोखंडे, सिद्धेश आंब्रे, अरुण वानरे आणि रमेश गावीत यांनी घटनास्थळी धाव घेतली. देवरुख येथून वनपाल नानू गावडे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक कराडे, आकाश कडूकर, सुप्रिया काळे, किरण पाचर्णे आणि शर्वरी कदम यांची टीमही घटनास्थळी पोहोचली.
बिबट्याला खुराड्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात बंद करण्यासाठी वनविभागाला बरीच मेहनत घ्यावी लागली. खुराड्यात अडकलेला बिबट्या अत्यंत अस्वस्थ आणि आक्रमक झाला होता. त्याला बाहेर येण्यासाठी वारंवार प्रयत्न करताना किरकोळ दुखापतीही झाल्या. आसपास जमलेली गर्दी आणि वाढता गोंधळ यामुळे तो अधिक चौखूर उधळत होता.
दरम्यान, बिबट्याच्या खुराड्यात अडकण्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. तूरळसह कडवई, चिखली, आरवली, धामणी आदी गावांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली. महामार्गालगतच घटना घडल्याने अनेक प्रवासी आणि वाहनचालकही थांबून बिबट्याचे दर्शन घेऊ लागले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची रांग लागली होती. पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठीही विशेष मेहनत घ्यावी लागली.
सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला शिताफीने पिंजऱ्यात बंद करण्यात यश मिळवले. दरम्यान, हीच व्यक्तीकरण करणारी बाब म्हणजे, शिकार करण्यासाठी आलेला बिबट्याच स्वतः शिकार झाल्याचा हा प्रकार होता. या घटनेने पुन्हा एकदा मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि याचे परिणाम अधोरेखित केले आहेत.
विशेष म्हणजे, या घटनेच्या काही तास आधी शनिवारी मध्यरात्री संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तूरळ परिसरात गस्त घालत असताना त्यांना हरेकर वाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे खुराड्यात अडकलेला बिबट्या हाच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी अवधूत कुंभार यांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या वेळेवरच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. वन्यप्राणी व मानवी वस्त्यांमधील संघर्ष आणि वन्यजीव संरक्षण याविषयी अधिक व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित होते.