(राजापूर / तुषार पाचलकर)
लांजा तालुक्यातील कुरंग मधलीवाडी येथे घराचे छप्पर तोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी झर्ये येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार श्रीपाद महादेव कदम (वय 52, सध्या रा. मीरा-भाईंदर, जि. ठाणे) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे आणि साक्षीदारांचे कुरंग मधलीवाडी येथे सामूहिक मालकीचे घर आहे. या घराचे छप्पर एकच असून आतील भाग वेगळा आहे.
घराच्या दुरुस्तीचे काम बाळकृष्ण रमेश पांचाळ (रा. झर्ये, ता. राजापूर) यांनी घेतले होते. मात्र, तक्रारदारांनी स्पष्ट परवानगी नाकारून “माझ्या भागाचे काम करू नये” असे सांगितले होते. तरीदेखील आरोपीने 15 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान तक्रारदारांच्या भागातील छपरावरील कौले, लाकडी रिपा आणि वासे काढून नुकसान केले. तसेच घरात प्रवेश करून अतिक्रमण करत आतील सामानाची नासधूस केल्याचा आरोप आहे. या घटनेत छपराचे साहित्य तोडून व घरातील वस्तूंची हानी करत एकूण 4 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 329(4) व 324(5) नुसार आरोपी बाळकृष्ण पांचाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.

