(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ येथे घडलेल्या प्रकरणात नाटे सागरी पोलिसांनी केवळ ४८ तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करत कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ व लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपीविरुद्ध इतक्या कमी वेळेत कठोर कारवाई करून पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात ‘शून्य सहनशीलता’ची भूमिका अधोरेखित केली आहे.
२५ ऑगस्ट २०२५ रोजी पीडित महिलेकडे आरोपीने अश्लील वर्तन केले. तक्रार दाखल होताच नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. महिलांच्या सन्मानाशी निगडित या गंभीर गुन्ह्यात कोणताही विलंब न लावता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या सूचनांनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने वेगाने कारवाई केली. बीट हवालदार एस. एस. इंगळे यांनी पंचनामा करून पुरावे गोळा केले, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि पोलीस हवालदार हुजरे यांच्यासह संपूर्ण पथकाने समन्वयाने काम करत आरोपीस ताब्यात घेऊन ४८ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या जलद आणि ठोस कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व पोलिसांबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या कामगिरीचे मनापासून कौतुक केले असून, ही कारवाई इतर गुन्हेगारांसाठी धडा ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

