(राजापूर)
गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या संततधारेने सोमवारी मध्यरात्रीपासून जोर धरला आणि मंगळवारी पहाटेपर्यंत पावसाचा जोर आणखी वाढल्याने राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सपर्यंत पाणी शिरले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळकडे जाणारा मार्ग तसेच शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले आहेत. व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
मध्यरात्रीनंतर अर्जुना नदीची पाणीपातळी वाढली, तर कोदवली नदीने शहर बाजारपेठेत शिरकाव केला. परिणामी भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. शिवाजी पथ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून व्यापारी व नागरिकांनी आपापले सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे.
मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास जवाहर चौक पाणी वाढल्याने शहरातील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, हवामान खात्याने कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्रीच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
याचदरम्यान, सकाळी साडेसहा वाजता अनुस्कुरा घाटात दरड कोसळली. घाटमाथ्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली असून प्रशासनाने तात्काळ यंत्रणा पाठवून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे

