(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील कोंडतिवरे जि.प.प्राथमिक शाळा कोंडतिवरे येथील इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या कु. प्रशिक दत्तात्रय गायकवाड याने सन २०२४-२५ मध्ये आयोजित मंथन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत राज्यात सहावा आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. प्रशिकने १५० पैकी १४० गुण मिळवत हे यश मिळवले.
त्याच्या या यशाबद्दल मंथन वेलफेअर फाउंडेशन तर्फे जिजामाता हायस्कूल, रायपाठण येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक श्री. करंदीकर सर, सौ. सावंत मॅडम, श्री. नाईकवडी सर, प्रमुख मार्गदर्शक श्री. सुशांत तिवले सर, श्री. भांडेकर सर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी प्रशिकच्या पालकांसह गावातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दादासो ठोंबरे सर यांनी तर उत्कृष्ट नियोजनातून हा कार्यक्रम संस्मरणीय ठरवण्यात आला. प्रशिकच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि स्वतःचा अभ्यास यामुळे हे यश मिळवता आले, असे प्रशिकने यावेळी सांगितले.