(राजापूर /प्रतिनिधी)
सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना राजापूर तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे घडली. या प्रकारात ५४ वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुवर्णा मोहन खानविलकर (वय ५४, रा. तेरवण थोरलीवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या घराच्या स्लॅबसाठी तसेच गुरांना पाणी पाजण्यासाठी सामाईक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी विहिरीवरील पाणी काढण्याचे साहित्य काढण, रहाटाची कपी, दोरी आणि रहाटाचा दांडा जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या संबंधितांना विचारणा केली असता, “मला माहिती नाही,” असे उत्तर देण्यात आले. यानंतर “असे प्रकार वारंवार घडत आहेत,” असे फिर्यादींनी म्हटल्याने वादाला तोंड फुटल्याचे सांगितले जाते. काही क्षणांतच या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी शिवीगाळ करत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रुपाली रवींद्र खानविलकर यांनी हातातील लाकडी दांडक्याने सुवर्णा खानविलकर यांच्या डाव्या हातावर जोरदार प्रहार केला. या मारहाणीत त्या जखमी झाल्या. या प्रकरणी रुपाली रवींद्र खानविलकर, रवींद्र यशवंत खानविलकर, चंद्रकांत यशवंत खानविलकर आणि सत्यवान यशवंत खानविलकर (सर्व रा. तेरवण थोरलीवाडी, ता. राजापूर) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

