(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोल्हापूरहून जयगड (रत्नागिरी)कडे साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आंबा घाटात भीषण अपघात झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (२४ एप्रिल) सकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील आंबा घाटातील दख्खन गावाजवळील धोकादायक वळणावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (क्रमांक MH/10/DT/4409) क्रमांकाचा ट्रक ३१ टन साखर घेऊन कोल्हापूरहून जयगडकडे निघाला होता. चालक समशेर अन्सारी (वय ४०, रा. झारखंड-बिहार) हा वाहन चालवत असताना घाटातील तीव्र वळणावर नियंत्रण सुटले. अतिवेग, निष्काळजीपणा आणि झोपेच्या अंमलामुळे ट्रकने स्वतःची लेन सोडून मध्यभागी असलेला डिव्हायडर ओलांडला आणि समोरच्या लेनमध्ये घुसला. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या खोल चरात जाऊन ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात चालक समशेर अन्सारी याच्या डोक्याला, हाताला, पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय, साखरपा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्यांतर्गत साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच हातखंबा येथील वाहतूक मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारीही तत्काळ हजर राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम हाती घेतले. सुदैवाने या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे. या अपघाताचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

