( मुंबई )
महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत बोनस व रजेचे वेतन पुन्हा पूर्वीप्रमाणे दरमहा अदा करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीतील हजारो कंत्राटी कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागाने 21 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, यापूर्वी नोव्हेंबर 2025 ते ऑक्टोबर 2026 या कालावधीतील बोनस व रजेचे वेतन एकत्रितपणे ऑक्टोबर 2026 मध्ये देण्याची पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत वेतन मर्यादेच्या व्याख्येत झालेल्या बदलामुळे हा निर्णय मागे घेत आता दरमहा वेतनातच बोनस व रजेचे वेतन समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील थकीत बोनस व रजेचे वेतन मे 2026 च्या वेतनात देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली रक्कम कामगारांना परत मिळणार आहे.
या निर्णयासाठी भारतीय मजदूर संघ व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने प्रशासन, केंद्र व राज्य सरकार तसेच ESICकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी ESIC वेतन मर्यादा वाढवण्याची मागणीही जोरदारपणे मांडली होती.
दरम्यान, कंत्राटी कामगारांच्या हितासाठी अन्य महत्त्वाच्या बाबींवरही सकारात्मक आश्वासने देण्यात आली आहेत. संपर्क पोर्टलवर कोर्ट प्रकरणातील कामगारांची नावे स्पष्ट दिसतील, प्रमुख नियोक्त्याच्या लेखी परवानगीशिवाय कामगार कपात केली जाणार नाही, तसेच नियमभंग करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा विभागाच्या बैठकीत देण्यात आली.
16 एप्रिल रोजी ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक राजेंद्र पवार आणि मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके उपस्थित होते. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, 16 एप्रिल रोजी मुंबईतील बांद्रा येथे भारतीय मजदूर संघाचा राज्यव्यापी कामगार आक्रोश मोर्चा पार पडला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लवकरच होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांनी दिली. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अभिजीत परीट यांनी दिली.

