(नवी दिल्ली)
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने टोल टॅक्सच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करत, महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असताना ७० टक्क्यांपर्यंत टोल सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. एनएचएआयच्या नव्या नियमांनुसार, दोन पदरी राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी वाहनचालकांना आता फक्त ३० टक्के टोल भरावा लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांत सुधारणा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ मध्ये सुधारणा केल्या आहेत. या बदलांनुसार, ज्या दोन पदरी महामार्गांचे चौपदरीकरण किंवा अधिक रुंदीकरण सुरू आहे, तिथे पूर्ण टोल आकारला जाणार नाही. बांधकाम काळात प्रवाशांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी थेट ७० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
टोल सवलत कधीपासून लागू?
सुधारित नियमांनुसार, प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांना टोलच्या केवळ ३० टक्के रकमेचा भरणा करावा लागेल. म्हणजेच या कालावधीत ७० टक्के टोल सूट लागू राहील. विशेष म्हणजे, एनएचएआय दरवर्षी साधारणपणे ७ ते १० टक्क्यांनी टोल दर वाढवते, मात्र नव्या नियमानुसार बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यांवर ही सवलत कायम राहणार आहे. हा नियम सध्या सुरू असलेल्या तसेच नव्या सर्व प्रकल्पांवर लागू करण्यात आला असून याबाबत सरकारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
चौपदरी महामार्ग रुंदीकरणावर २५% सूट
नवीन नियमांनुसार, जर एखाद्या चौपदरी महामार्गाचे सहा किंवा आठ पदरीकरणाचे काम सुरू असेल, तर त्या ठिकाणी टोल टॅक्समध्ये २५ टक्के सूट दिली जाईल. म्हणजेच वाहनचालकांना ७५ टक्के टोल भरावा लागेल.
याशिवाय, एखाद्या टोल रस्त्याचा संपूर्ण खर्च वसूल झाल्यानंतर फक्त ४० टक्के टोल आकारण्याचा नियम यापूर्वीपासूनच लागू आहे.
देशभरात २५ ते ३० हजार किमी रस्त्यांचे काम
सरकारी आकडेवारीनुसार, देशात सध्या २५ ते ३० हजार किलोमीटरचे दोन पदरी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेत आहेत. यासाठी सुमारे १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गांवर सध्या मालवाहतुकीचा वाटा ४० टक्के असून, तो ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चौपदरी आणि विस्तारित कॉरिडॉरमुळे व्यावसायिक वाहनांचा सरासरी वेग ताशी ३०-३५ किमीवरून ५० किमीपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांना काय फायदा?
नव्या टोल नियमांमुळे बांधकाम काळात होणारा त्रास आणि वाढीव खर्च दोन्ही कमी होणार आहेत. नियमित प्रवासी, मालवाहतूकदार आणि लांब पल्ल्याचे वाहनचालक यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

