(नवी मुंबई / वृत्तसंस्था)
नवी मुंबईतील कोपरी गावात बुधवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या या मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा जीव गेला. गणेश गुप्ता (वय ९) आणि गोलू मन्सुरी (वय १०, दोघेही रा. कोपरी गाव) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी गणेश आणि गोलू हे दोघे कोपरी येथील तलावाच्या परिसरात गेले होते. पोहता येत नसतानाही दोघे पाण्यात उतरले. मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्याने ते बुडू लागले. मुलांचा जीव धोक्यात असल्याचे दिसताच एका स्थानिक नागरिकाने त्यांना वाचवण्यासाठी तातडीने तलावात उडी घेतली. त्याने दोघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत दोन्ही मुले पाण्यात पूर्णपणे बुडाली होती.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तलावातून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


