(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहराच्या मध्यवर्ती भागात दिमाखात उभी असलेली आणि गेली तब्बल पंचावन्न वर्षे रत्नागिरीच्या प्रशासकीय इतिहासाची साक्ष देणारी नगर परिषदेची जुनी इमारत आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जीर्णावस्थेला पोहोचलेल्या या वास्तूच्या निर्लेखनाचे काम वेगाने सुरू असून गुरुवारी या इमारतीचा एक मोठा भाग जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.
सन १९७१ मध्ये उभारण्यात आलेल्या या इमारतीचे उद्घाटन १६ मे १९७१ रोजी तत्कालीन खासदार दिवंगत शामराव पेजे यांच्या हस्ते पार पडले होते. त्यानंतर अनेक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या कार्यकाळाचे साक्षीदार ठरलेले हे भवन रत्नागिरीच्या प्रशासकीय जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेली ही टुमदार वास्तू नागरिकांचे लक्ष वेधून घेत असे. मात्र, काळाच्या ओघात इमारतीची झीज वाढत गेली आणि ठिकठिकाणी बांधकाम ढासळू लागल्याने ती धोकादायक ठरू लागली होती. नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर जुनी इमारत रिकामी करून सर्व कागदपत्रे व साहित्य नव्या इमारतीत हलविण्यात आले. त्यानंतर आता या जुन्या वास्तूच्या निर्लेखनाला गती देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत इमारतीचा मोठा भाग पाडण्यात आला असून परिसरात माती व अवशेषांचा ढिगारा साचलेला दिसत होता. येत्या काही दिवसांत ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करून जागेचे सपाटीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, जुन्या इमारतीच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण १ मे रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजात आधुनिकतेची नवी पहाट उगवणार असून जुन्या वास्तूच्या आठवणींना उजाळा देत शहर नव्या अध्यायात प्रवेश करणार आहे.

