(पनवेल)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना टोयोटा अर्बन क्रूझर आणि बलेनो कार यांच्यात पनवेलजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, टोयोटा अर्बन क्रूझर (UP 32 MU 2287) ही कार मुंबईहून लोणावळ्याकडे जात असताना तिचा चालक नूरआलम खान (३४, रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) याने अतिवेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवत समोरून जाणाऱ्या बलेनो कार (MH 09 GU 7245) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टोयोटा कार सिमेंटच्या दुभाजकावर आदळून उलटली.
या अपघातात अस्फिया बानू मोहं. फरीद खान (२२) हिचा जागीच मृत्यू झाला. तर नूरआलम खान, मोहं. अरबाज मोहं. अहमद (२४), मोहं. आरीफ मोहं. आक्षम (२४) आणि रिजवान (२४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पळस्पे पोलीस, पनवेल तालुका पोलीस, तसेच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. सध्या या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित वाहनचालकाविरुद्ध बेदरकार वाहन चालवणे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

