(चिपळूण / वार्ताहर)
पोफळी येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या (एम.एस.ई.बी.) वसाहतीतील बंद सदनिका फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ९६ हजार ५६९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ ते ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोफळी येथील एम.एस.ई.बी. कॉलनी येथे वैभव सकपाळ (वय ४१) राहतात. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराच्या साहाय्याने मुख्य दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम लंपास केली.
चोरीस गेलेल्या ऐवजात ३१ ग्रॅम वजनाची सोन्याची लोटस चेन, तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याच्या रिंगा, लक्ष्मी टॉप्स आणि १० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ९६ हजार ५६९ रुपये आहे.
३० ऑक्टोबर रोजी सकाळी घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर वैभव सकपाळ यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. वीज मंडळाच्या रहिवासी वसाहतीतच घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


