(मुंबई)
राज्याच्या गृह विभागाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत असलेली Y+ सुरक्षा हटवून आता त्यांना Z+ सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याव्यतिरिक्त उर्वरित तीन खात्यांची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गृह विभागाकडून त्यांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि सुरक्षा दर्जा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Z+ सुरक्षा म्हणजे काय?
Z+ सुरक्षा ही देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. या अंतर्गत
- १० कमांडोंची तुकडी
- सुमारे ५५ प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी
- बुलेटप्रूफ वाहन
- २४ तास संरक्षण
अशी व्यवस्था करण्यात येते. SPG नंतरची ही भारतातील दुसरी सर्वोच्च सुरक्षा श्रेणी मानली जाते. राज्य सरकारकडून X, Y, Z आणि Z+ अशा विविध सुरक्षा श्रेणी दिल्या जातात. सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी धोका मूल्यांकन करून सुरक्षा दर्जा ठरवला जातो. अतिमहत्त्वाच्या पदावरील व्यक्ती किंवा विशेष धोका असलेल्या नेत्यांना अशी सुरक्षा पुरवली जाते. सुनेत्रा पवार यांच्यावर वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि राज्याच्या राजकारणातील त्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेता, Z+ सुरक्षेचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
कार्यभार स्वीकारण्याची तारीख लवकरच
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्या सध्या बारामती येथे आहेत. शपथविधीनंतर त्यांनी सातारा जिल्ह्यात कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

