(मुंबई)
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची अटक करत झिया जेकब (31) हिला मिरारोड येथून ताब्यात घेतले आहे. ती मुख्य आरोपी आयुष विकी साहित्यची लिव्ह-इन पार्टनर असून ड्रग्ज व्यवहारातील आर्थिक व्यवहारांमध्ये तिचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील ती अकरावी आरोपी ठरली आहे.
बँक खात्याद्वारे ड्रग्ज पैशांचा व्यवहार
तपासादरम्यान झिया जेकब हिच्या बँक खात्यातून ड्रग्ज विक्रीशी संबंधित व्यवहार झाल्याचे उघड झाले. मुख्य आरोपी आयुष साहित्यने ड्रग्ज विक्रीनंतर पेमेंटसाठी तिच्या खात्याचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही मिरारोड परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू; प्रकरण गंभीर
या प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा मिळाले जेव्हा नेस्को सेंटरमधील एका म्युझिक इव्हेंटदरम्यान पुरवण्यात आलेल्या ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उघड करण्यासाठी आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली.
11 जण अटकेत, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे अधिकारीही जाळ्यात
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लाइव्ह इव्हेंट्सचे वरिष्ठ व्यवस्थापक सनी जैन (31) आणि लाइव्ह इव्हेंट्स व आयपीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण बलराम कुरुप (46) यांचाही समावेश आहे. त्यांना 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. दोघांवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून 18 एप्रिल रोजी बोरीवली न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
‘मार्क’ नावाचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर फरार
तपासात ‘मार्क’ नावाच्या ड्रग्ज तस्कराचे नाव समोर आले असून तो या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सध्या तो विदेशात फरार असल्याची शक्यता असून पोलिसांनी त्याला वाँटेड घोषित केले आहे. त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

