(मुंबई)
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 10 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. विशेष म्हणजे, मतदानानंतर त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे.
पक्षनिहाय जागांचे गणित
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार जागांचे संभाव्य वाटप जवळपास स्पष्ट झाले आहे.
- भाजप – 6 जागा
- शिवसेना – 2 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस – 1 जागा
- महाविकास आघाडी – 1 जागा
या पार्श्वभूमीवर भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे
भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी हालचालींना वेग दिला असून तब्बल 30 इच्छुकांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. या यादीत माजी आमदार-खासदारांसह संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात आल्याची माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य उमेदवारांमध्ये माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी यांची नावे चर्चेत आहेत. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि बच्चू कडू या नावांची तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धिकी, उमेश पाटील, संजय दौंड, सुरेखा ठाकरे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, राजेंद्र जैन या नावांची चर्चा आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे पुढे आहेत.
महाविकास आघाडीत समन्वयाची चर्चा
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, उद्धव ठाकरे निवडणूक लढवत असतील तर काँग्रेस त्यांना पूर्ण समर्थन देईल. मात्र त्यांनी निवडणूक न लढवल्यास ती जागा काँग्रेसला मिळावी, अशी मागणीही त्यांनी मांडली. आघाडीमध्ये समन्वय राखण्यासाठी पुढील राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भातही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.
या निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, 23 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली, नामनिर्देशन पत्र गुरूवार, 30 एप्रिल 2026 रोजी सादर करण्यात येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी शनिवार 2 मे 2026 रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक सोमवार 4 मे 2026 असा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बुधवार 13 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.

