(मुंबई)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ही युती केवळ राजकीय नसून महाराष्ट्र आणि मुंबईकरांच्या हितासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी जी लढाई आम्ही लढत आहोत, त्यासाठी सर्व शक्तींना एकत्र आणणे ही आमची ताकद आहे. ही युती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मुंबईकरांच्या हितासाठी आहे. हा क्षण मुंबई आणि संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईला ‘हिरवा रंग’ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या विचारसरणीवर टीका केली. ते म्हणाले की, भाजप प्रत्येक विषयाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहते. मात्र, हे लक्षात ठेवायला हवे की प्रत्येकाचे रक्त लालच असते. आम्ही कोणत्याही रंगासाठी नाही, तर इथल्या माणसांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी लढत आहोत.
भाजपवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी थेट सवाल उपस्थित केला. भाजपला जेव्हा-जेव्हा पराभव दिसू लागतो, तेव्हा ते पैसा, जात आणि भाषेचे मुद्दे पुढे आणतात. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो, असा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपने देशासाठी नेमके कोणते ठोस काम केले आहे, हे एकदा जनतेसमोर मांडावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

